vvvvvvvvvvvvvv
स गळतीमुळे मजुराचे घर जळाल्याने घाटे कुटुंबावर उपासमारीची वेळ
------------------------------------------------------------
घरातील सर्व संसारोपयोगी वस्तूंसह पाच ते सहा लाखांचा ऐवज जळून खाक
------------------------------------------------------------
मुखेडः- (ता.प्र.)
येथून जवळच असलेल्या मौ.येवती येथे रविवार दि.१६ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ७ वाजता गणपत घाटे यांच्या घरातील स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरच्या पाईपमधून झालेल्या गॅस गळतीमुळे लागलेल्या आगीत घरातील संसारोपयोगी वस्तूंसह पाच ते सहा लाखांचा ऐवज जळून खाक झाला. सुदैवाने जीवितहानी टळली असून एका शेत मुजरावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली आहे. येवती येथील शेतमजूर गणपत माधव घाटे (वय ५६ वर्ष) यांच्या घरी रोजच्याप्रमाणे सकाळी ७ वाजता चहा करण्यासाठी घरातील महिला सौ.गिरजाबाईने गॅस चालू केला असता, गॅस सिलेंडरचा पाइप लीकेजमुळे अचानक आग लागली असून खपरेल घर असल्याने त्वरित घरातील वासे, तुळया व लाकडी दरवाज्यांनी पेट घेतला. घरातील महिला आरडा-ओरड करीत घराबाहेर पडल्यामुळे सुदैवाने जीवितहानी झाली नाही. गावातील आजूबाजूच्या लोकांनी आग विझविण्याचे खूप प्रयत्न केले. त्वरित मुखेड येथील अग्निशामक दलाच्या गाडीला पाचारण करण्यात आले. परंतु गाडी येईपर्यंत संपूर्ण घर जळून खाक झाले. मुलगा सतिश उर्फ सटवा गणपती घाटे वय १९ वर्षे या युवकाचे लग्न ठरल्याने लग्नाच्या कपड्यांचा बस्ता बांधून घरात ठेवला होता. नवरीसाठी घेतलेले सोन्याचे झुमके, पायातील चैन, वाळे व नगदी दोन लाख रुपये, घरातील संसारोपयोगी सर्व वस्तू भांडी, नवे- जुने कपडे, ज्वारी, तांदूळ, मूग, तूर, साखर, उडीद डाळ यांच्यासह शैक्षणिक कागदपत्रे, राशन कार्ड, जातीचा दाखला, ड्रायव्हिंग लायसन यांच्यासह जवळपास पाच ते सहा लाखांचा ऐवज जळून खाक झाला. या घटनेची माहिती मिळताच मुखेड पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरिक्षक गजानन काळे यांनी प्रत्यक्ष येऊन घडलेल्या घटनेचा पंचनामा केला. तर सोमवारी मुखेड तहसील कार्यालयाकडून पंचनामा झाला आहे. सध्याला या घरातील माणसे उघड्यावर आले असून घाटे कुटुंबावर मोठे संकट आले आहे. शासन व लोकप्रतिनिधींकडून काहीतरी आर्थिक मदत त्वरित मिळावी, अशी पिडीत गणपत घाटे यांना अपेक्षा आहे. तर शासनाने या कुटुंबाला आर्थिक मदत व तसेच शासनाकडून त्वरित घर देण्यात यावे, अशी मागणी गावकऱ्यांकडून होत आहे.
Attachments area