धर्मनिरपेक्ष स्वराज्याचे प्रवर्तक – छत्रपती शिवराय





भारत हा राजांचा देश म्हणून ओळखला जातो, परंतु भारतातच नव्हे तर जगभरातही ज्या राजाचे स्मरण  केले जाते असे एकमेव राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख केला जातो. खऱ्‍या अर्थाने सर्व प्रजेला आपले वाटेल अशा स्वराज्याची स्थापना त्यांनी केली भारतात बुध्दकाळात असलेल्या कल्याणकारी, न्यायी, धर्मनिरपेक्ष आणि लोकमताच्या तत्वावर आधारित अशा राज्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्रात मुहर्तमेढ रोवली.

 

शिवरायाच्या स्वराज्याला जाती, धर्म, पंथ,प्रांताचा परिघ नव्हता अठरापगड जातीच्या समूहांना त्यांनी न्याय दिला. महाराजांनी स्वराज्याची निर्मिती करताना ब्राम्हण, मुस्लीम, हिंदू असा भेदभाव केला नाही. या सर्वांना एकत्र आणून धर्मनिरपेक्ष स्वराज्याची निर्मिती केली. तर धर्मनिरपेक्षतेची शिकवण त्याच्या पूर्वजाकडून मिळालेली आहे. पूर्वजांचे मिळालेले बाळकडू आणि स्वत:ची धर्मसहिष्णुवृत्ती यातूनच स्वराज्याचा डोलारा त्यांनी उभारल्याचे दिसते.

 

छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी यांनी अहमदनगरच्या शहाशरीफ या पीरास शहाजीराजे यांच्या जन्माचा वेळी नवस केला होता. पीर नवसाला पावल्याने मालोजीने मुलांची नावे शहाजी व शरीफजी ठेवली असे ’91 कलमी बखर’ सांगते. शिवाजी महाराजाना मुळातच धर्मनिरपेक्षतेचे धडे मिळाले होते. शहाजी राजांची ही धर्मनिरपेक्षता पुढे शिवाजी महाराजांनी अंगीकारली. राजमाता जिजाऊने रामायण, महाभारताची शिकवण देताना त्यांना धर्मनिरपेक्षतेची शिकवण दिलेली आहे. याच पद्धतीने महाराजांनी पुढे आपले साम्राज्य निर्माण करताना हिंदू, मुस्लीम असो की, ब्राम्हण असो की किंवा बारा बलुतेदार अठरा अलुतेदार हे सर्व महाराजांसाठी एक समाज होते.

 

शिवाजी महाराजांनी प्रत्येक धर्मासाठी वेगवेगळ्या पध्दतीचे कार्य केले, ते धर्मनिरपेक्ष होते म्हणून त्यांनी पुणे परगण्यातील हवेली येथील काजी सनदा 1656 मध्ये पुन्हा चालू केल्या व 1671 मध्ये शिवाजीने आळंदीच्या ज्ञानेश्वर मंदिरास, तर 1674 मध्ये हजरत पिरास इनामे दिलेले आहेत.

 

शिवाजी महाराजांच्या काळात अनेक संताचा प्रभाव होता. महाराजांनी जातिभेद न करता सर्व संताना एकसमान मानले. त्यांचा आदर केला. ते संत तुकाराम महाराज, समर्थ रामदास,केळुसीचे बाबा याकृत सान, पाटगावचे मौनी बाबा, निश्चलपुरी गोसावी, पोलादपूरचे परमानंद बाबा, वडगावचे जयराम स्वामी, चिंचवडचे नारायण देव, धामणगाव येथील बोधले बाबा, ब्रम्हनाळ येथील आनंद मूर्ती, निगडीचे रंगनाथ स्वामी, त्यांचे बंधू विठ्ठल स्वामी, एकनाथाचे वारसदार भानुदास महाराज, बारामतीचे त्रिंबक नारायण बुवा या प्रमुख साधुसंताचा त्यांनी सतत आशीर्वाद मिळविला होता.

 

सुरत लुटीच्या वेळेस महाराजांनी ख्रिश्चन धर्मगुरूंना वंदन केले असे संदर्भ मिळतात. त्याचबरोबर हिंदू धर्माचे रक्षण करताना शिवाजी महाराजानी दुसऱ्‍या धर्माचा द्वेष कधी केला नाही. महाराजांच्या राज्यात सर्व धर्मियांना धार्मिक स्वातंत्र्य होते. नेताजी पालकरानी मुस्लीम धर्म स्वीकारला होता. पालकरानी महाराजांना भेटून हिंदू धर्मात घेण्याची विनंती केली तेव्हा त्यास महाराजानी शुध्दीकरण विधी करवून पुन्हा हिंदू धर्मात घेतले यावरून महाराजाचे धर्माबाबत उदारमतवादी धोरण समजते.

 

महाराजांच्या काळात औरंगजेबानी जिझिया कर लागू केल्यावर त्याला लिहिलेल्या पत्रात ,तुमचा जर पवित्र ग्रंथ कुराणावर विश्वास असेल तर त्यात ईश्वराचे वर्णन ‘रब – उल – आलमीन’ सर्व लोकांचा ईश्वर असे केले आहे. तो केवळ ‘ रब – उल - मुसलमान म्हणजे मुसलमानांचाच ईश्वर नाही तर मशिदीत अथवा मंदिरात त्याच सर्वठायी ईश्वराची आराधना, श्रध्दा होते.” असे महाराजांनी आपल्या पत्रातून औरंगजेबास कळविले होते.

 

शिवरायांच्या सेवेत असलेल्या विविध जाती – धर्माच्या मावळ्यांनी शिर हातावर घेवून आपल्या स्वराज्याचे रक्षण केलेले दिसते त्यात मानकोजी दहातोंडे, येसाजी कंक, तानाजी मालुसरे, बाजीप्रभू देशपांडे, तानाजी मालुसरे, बर्हिजी नाईक, संभाजी कावजी – जीवा महाला, नूरबेग,काझी हैदर, दौलतखान सिध्दि मेस्त्री, मदारी मेहत्तर, मोरोपंत पिंगळे, हंबीरराव मोहिते, सूर्यसेन काकडे, म्हाळोजी घोरपडे, फिरंगोजी नरसाळे, येलाजी मांग, रायप्पा महार अशा कितीतरी शूरवीरांचा समावेश होता.

 

महाराजांनी समाजातील सर्व वर्गाना आपल्या राज्यकारभारात सामावून घेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे महाराजाला वरिष्ठ वर्गीयापेक्षा सर्वाधिक पाठिंबा इतर सामान्य मानल्या गेलेल्या वर्गातूनच मिळाला. महाराजानी आपल्या प्रशासनात प्रत्येक समाजाचे अधिकारी नेमले. महाराजांच्या नौदलाचा अधिकारी दौलतखान व शरीर संरक्षक इब्राहीम होता व औरंगजेबाकडे बोलणी करण्यास पाठवण्यात आलेला वकील काझी हैदर तसेच आगऱ्‍याच्या सुटकेच्या वेळी मदारी मेहतर नावाच्या मुस्लीम सहकाऱ्‍याने शिवाजी राजांना अत्यंत मोलाचे सहकार्य केले. राजांच्या सैन्यात पठाणांची फलटण होती. महाराजांचा खाजगी चिटणीस मुल्ला काझी हैदर होता.

 

अर्थात छत्रपती शिवाजी महाराज हे मध्यकाळातील एकमेव कल्याणकारी व सर्व समुदायांना न्याय देणारे राजे होते. आधुनिक काळात ज्या समतावादी आणि धर्मनिरपेक्ष राज्याची आपण चर्चा करतो त्या आधुनिक मूल्यांचा प्रभाव त्यांच्या स्वराज्यावर सर्व अर्थाने उठून दिसतो. वास्तविक मध्यकाळात एका बाजूला बहुतांशी राजे हे धर्म हाच राज्यकारभाराचा आधार मानत होते त्याकाळात शिवाजी महाराजांचे धर्मनिरपेक्ष राज्याचे विचार व कार्य हे कायम दिपस्तंभासारखे मार्गदर्शक ठरणारे आहेत.

 

शिवरायांच्या जयंतीनिमित्त पुन्हा एकदा शिवअनुयायांनी सदाचार, स्त्री-पुरूष समता, धर्मनिरपेक्षतेची कास धरताना मनामनातील धर्मभेद, जातीभेद, प्रांतभेदाला मुठमाती देण्याचा संकल्प करण्याची आता ‘हीच ती वेळ’ आहे.