जन्मत:च प्रत्येकाला जगण्याचा अधिकार प्राप्त होतो. तसाच स्वप्न पहाण्याचा अधिकार प्रत्येकाला असतो, मात्र त्या स्वप्नांपर्यंत जाण्यासाठी अथक संघर्ष अटळ आहे. समाजव्यवस्थेची उतरंड आणि शिक्षणाची संधी अजूनही असंख्य मुलांपर्यंत पोहोचलेली नसतानाही संकटांवर मात करत पुंडी सारू ध्येयाकडे पाऊल टाकले आहे. झारखंडच्या खुंटी या आदिवासी जिल्ह्यातील हॉकी खेळाडू पुंडी सारू हिची अमेरिकेत आयोजित प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे. अमेरिकन दुतावास आणि शक्तिवाहिनी या सामाजिक संस्थेतर्फे झारखंडमधील मुलींसाठी हॉकी कम लिडरशीप कॅम्पचं आयोजन करण्यात आलं होतं. झारखंडच्या रांची, खुंटी, लोहरदगा, गुमला आणि सिमडेगा या भागातील १०७ मुलींमधून ५ मुलींची अमेरिकेत प्रशिक्षणासाठी निवड करण्यात आलेली आहे. यामध्ये पुंडी सारूने आपलं स्थान पक्कं केलं आहे
खुंटी जिल्ह्यातील हेसल या नक्षलग्रस्त भागात पुंडी आणि तिचं कुटुंब राहतं. आज पुंडीचं स्वप्न पुर्ण होत असलं तरी त्यासाठी तिला मोठा संघर्ष करावा लागला आहे. ४ भावंडापैकी पुंडीचा दुसरा क्रमांक लागतो. पुंडीचा मोठा भाऊ सहारा सारूचं १२ पर्यंतचं शिक्षण झालेलं आहे. पुंडी सध्या इयत्ता नववीत शिकत आहे, काही महिन्यांपूर्वीच पुंडीच्या बहिणीने दहावी नापास झाल्यामुळे आत्महत्या केल्यामुळे २ महिने पुंडी हॉकीपासून दूर गेली होती. शाळेत असतानापासून पुंडीला हॉकीची आवड निर्माण झाली आणि गेली ३ वर्षे ती हॉकी खेळते आहे. मात्र एक काळ असा होता की पुंडीच्या परिवाराकडे हॉकीस्टिक घेण्याचेही पैसे नव्हते. यासाठी पुंडीच्या परिवाराने घरातली नाचणी(धान्य) विकली. त्यामधून आलेले पैसे आणि पुंडीला शिष्यवृत्तीतून मिळालेल्या १५०० रूपयांमधून नवीन हॉकीस्टिक विकत घेतली. हॉकी खेळण्यासाठी पुंडी रोज आठ किलोमीटर सायकल चालवत खुंटीला जाते. खुंटीच्या बिरसा मैदानावर गेल्या ३ वर्षापासून ती हॉकी खेळते. पुंडीने अनेक स्पर्धांमध्ये बक्षिसं मिळवली आहेत. भारतीय महिला हॉकी संघातील निक्की प्रधान ही पुंडीची आदर्श आहे. पुंडी म्हणते मला तिच्यासारखे खेळता आले पाहिजे.
पुंडीचे वडील एतवा सारू हे मजुरीचं काम करायचे, त्यासाठी ते खुंटीला जायचे. मात्र एकेदिवशी घरी परतताना झालेल्या अपघातात त्यांच्या हाताला दुखापत झाल्यामुळे ते त्यानंतर मजूरी करू शकले नाही. ते सध्या घरीच असतात. ते आता जनावरांना चारायचं काम करतात. आई गृहिणी आहे. तिचं घर शेती आणि जनावरांच्या पालनपोषणावर चालतं. तिच्या घरात गाय, बैल, कोंबडी, शेळी आणि बकरी आहे. हलाखीच्या परिस्थितीत समोर आलेल्या संकटावर मात करत पुंडीने आपली जिद्द, चिकाटी सोडली नाही. याच सामर्थ्यावर तिने विजय मिळवला आहे. ती आता ध्येयाकडे वाटचाल करण्यासाठी सज्ज झालेली आहे.
पुंडी आणि तिच्यासोबत असणाऱ्या ४ मुली १२ एप्रिल २०२० रोजी अमेरिकेला रवाना होतील, अशी माहिती यूएसच्या सांस्कृतिक विभागाच्या सहाय्यक सचिव मॅरी रोईस यांनी दिली आहे.
पुंडीसारख्या असंख्य कर्तुत्ववान मुली विषमतेने ग्रासलेल्या व्यवस्थेच्या बळी ठरत आहेत. पुंडीला घरच्यांनी दिलेली साथ ही वाखाणण्याजोगी आहेण. परंतु महिला सबलीकरण म्हणून चालणार नाही, तर मुलींना प्रत्यक्ष संधी निर्माण केल्या पाहिजेत. यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. पुंडीला पुढे जाण्यासाठी सरकारने सर्वोतोपरी मदत केली पाहिजे. परिस्थितीशी दोन हात करत यशाचे शिखर गाठणारी पुंडी सारू हजारो मुलींसाठी प्रेरणादायी आहेच. पुंडी सारूच्या कर्तुत्वाला सलाम!
नवनाथ मोरे
9921976460
2 Attachments